
निमझरी शिवारात विजेचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू
अमळनेर पंकज शेटे I तालुक्यातील निमझरी शिवारात विजेचा तार तुटून पडल्याने शॉक लागून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

निमझरी शिवारात असलेल्या एका शेतात विद्युत प्रवाहाचा तार तुटून पडलेला होता. त्याचवेळी, स्वप्नील प्रकाश बोरसे (रा. सोनखेडी) यांच्या मालकीचे दोन बैल त्या शेतात चरत होते. तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने दोन्ही बैलांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गावातील तलाठी वंदना कोळी आणि पोलीस पाटील दिनेश मैलागीर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत बैलांचा पंचनामा केला आणि नुकसानीची नोंद घेतली. पंचनामा करताना सोनखेडी गावातील ग्रामस्थही उपस्थित होते.
या घटनेमुळे शेतकरी स्वप्नील बोरसे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीत काम करताना आणि जनावरे चारताना अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






