Crime

दिंडोरी तालुक्यातील शिवनई शिवारातील खुनाचा गुन्हा उघड, एक आरोपी ताब्यात

दिंडोरी तालुक्यातील शिवनई शिवारातील खुनाचा गुन्हा उघड, एक आरोपी ताब्यात

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावच्या शिवारातील शेतगट क्रमांक ३६-अ मधील विहिरीत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळला होता. या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळालyanंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०७/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, संशयिताने मयत व्यक्तीला ठार मारून त्याचे हात-पाय लोखंडी तारांनी बांधले आणि कमरेला साडीने मोठा दगड बांधून मृतदेह विहिरीत टाकला, जेणेकरून पुरावा नष्ट होईल.
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या घटनेचा तातडीने आढावा घेऊन तपास पथकांना तपास त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली.
मृतदेहावरील कपडे आणि वर्णनाच्या आधारे तपास पथकाने गुप्त माहितीच्या साहाय्याने मयत व्यक्तीची ओळख पटवली. मयत व्यक्ती हरी रामचंद्र किलबिले (वय ६४, रा. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असल्याचे समजले. तपासात असे आढळले की, मयत हरी किलबिले काही दिवसांपासून शिवनई परिसरात एका मूर्तिकाराकडे काम करत होता आणि तेथील शेडमध्ये राहत होता. तसेच, त्याच ठिकाणी हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथील एक जोडपेही राहत होते, अशी गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून पथकाने संशयित भारत काळू वाघ (वय २५, रा. हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान भारत वाघ याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, मयत हरी किलबिले याने त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती आणि तिची छेडछाड केली होती. याचा राग मनात धरून भारत याने हरी याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारांनी बांधले, कमरेला साडीने मोठा दगड बांधला आणि मृतदेह विहिरीत टाकला.
अटक आणि पुढील तपास संशयित भारत काळू वाघ याला या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.
पोलीस पथकाचे योगदान ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सपोनि सोपान राखुंडे, पोउनि सुदर्शन आवारी, अल्ताफ शेख, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस कर्मचारी विश्वनाथ काकड, श्रीकांत गारूंगे, प्रवीण काकड, सुमित आवारी, बाळा पानसरे, प्रदीप शिंदे, प्रेमानंद मुंढे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संतोष सोनवणे, दिलीप राउत, मंगल सोनवणे, प्रकाश गायकवाड, राहुल जोपुळे आणि नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button