विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुस्तक प्रकाशन आणि लेखक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पुस्तक प्रकाशन आणि लेखक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव, दि. १२ (प्रतिनिधी):कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पुस्तक प्रकाशन व लेखक सन्मान सोहळा शनिवार, दि. १२ जुलै रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
प्रा. जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात ‘सहज उपलब्धता, समान संधी, जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि माफक दरातील शिक्षण’ ही पाच प्रमुख उद्दिष्टे असून, देशातील सर्व विद्यापीठांनी या दिशेने कार्य करणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सध्या केवळ २८ टक्के असून, ते ५० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
विद्यापीठाच्या खुले वैकल्पिक अभ्यासक्रमांसाठी तयार केलेल्या १४ पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबद्दल प्रा. जोशी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच AEDP (Apprenticeship Embedded Degree Program) अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांना SWAYAM प्लॅटफॉर्मवरील कोर्सेस करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथील निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी भारतीय भाषांमधील पुस्तकांच्या निर्मितीवर भाष्य करताना सांगितले की, ३ लाख ९६ हजार भारतीय भाषांतील पुस्तके तयार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. मातृभाषेतून शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या गाभ्याशी पोहोचते, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बहुआयामी असून मातृभाषेतून शिक्षण देणे हे त्यातील एक महत्त्वाचे अंग आहे. विद्यापीठाने त्याच्या अंमलबजावणीत घेतलेले पुढाकार हे उल्लेखनीय आहेत. त्यांनी जाहीर केले की, प्रकाशित पुस्तकांची प्रत १०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची योजना आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके:
भारतीय सामाजिक समस्या, अन्न रसायनशास्त्र, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, सहकारी कायदा आणि सूक्ष्म वित्त पुरवठा (भाग १ व २), अन्न तंत्रज्ञान, आनंदाचे मानसशास्त्र (सत्र १), कल्याणाचे मानसशास्त्र (सत्र २), गांडूळ खत तंत्रज्ञान, व्यवसाय सांख्यिकी, कृषी भूगोल, वनस्पती व रोपवाटिका व्यवस्थापन, दैनंदिन जीवनातील केमिस्ट्री, लोकसंख्या भूगोल, लेखाशास्त्राची मूलतत्त्वे आणि आधुनिक कार्यालय व्यवस्थापन.
यावेळी PG डिप्लोमा इन पेटंट व्हॅल्युएशन अँड मॅनेजमेंट या नव्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीची घोषणाही कुलगुरूंनी केली. याशिवाय विद्यापीठाने प्राप्त केलेल्या पेटंटची माहिती पुस्तिका देखील यावेळी प्रकाशित करण्यात आली.
लेखक प्रा. शैलेश वाघ आणि प्रा. प्रभाकर महाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी प्रवीण चंदनकर यांनी तर आभारप्रदर्शन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. पवित्रा पाटील, बौद्धिक संपदा कक्ष समन्वयक प्रा. डी. जी. हुंडीवाले, प्रा. विकास गीते, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, विविध प्रशाळांचे संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.