‘सत्यशोधक समाजाची वर्तमान फलश्रुती’ विषयावर जयसिंग वाघ यांचे व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी) दि. २५ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा फुले अध्ययन केंद्रातर्फे सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्ताने ‘सत्यशोधक समाजाची वर्तमान फलश्रुती’ या विषयावर दि. २४ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत जयसिंग वाघ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानातून सत्यशोधक समाजाच्या कार्याची महती
जयसिंग वाघ यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची वैचारिक पार्श्वभूमी आणि स्थापनेनंतर केलेल्या लोकोद्धारक चळवळीचे वर्तमान काळातील महत्त्व स्पष्ट केले. आजचे बहुजन समाजाचे नेते घडविण्यात सत्यशोधक समाजाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. थोडक्यात, आरक्षण विषयक राजकीय चळवळी या आजच्या काळातील सत्यशोधक समाजाची फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधानात सत्यशोधक चळवळीची फलश्रुती: प्रा. पगारे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र तसेच विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु. पगारे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. पगारे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून वर्णव्यवस्थेवर प्रहार केला आणि बहुजन समाजाला दिशा दिली. याच कार्याची फलश्रुती म्हणून राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांचे हक्क सुरक्षित केले. तसेच, भारतातील प्रत्येक माणसाच्या हक्क-अधिकारांविषयी सत्यान्वेषी भूमिकेतून आणि विवेकशील विचारातून निर्माण झालेले भारतीय संविधान हे सत्यशोधक चळवळीची अंतिम फलश्रुती आहे, असे त्यांनी सांगितले.
यशस्वी आयोजन
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांनी केले. डॉ. दीपक खरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जितेंद्र नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी विचारधारा प्रशाळेतील तसेच भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






