‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये जळगाव पोलिसांची धडक कारवाई!

‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये जळगाव पोलिसांची धडक कारवाई!
हातभट्टी दारूचे ११८ गुन्हे, जुगाराचे ७२ गुन्हे दाखल; १० फरार आरोपी जेरबंद
जळगाव, प्रतिनिधी : जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी कारवाया आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाने १० ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हातभट्टी दारूविरोधात ११८ गुन्हे दाखल करून ११८ जणांवर कारवाई करण्यात आली. जुगाराचे ७२ गुन्हे दाखल करून ८५ जणांवर कारवाई करण्यात आली, तर विविध गुन्ह्यांतील १० पाहिजे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे आणि संबंधित शाखांच्या पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी तपासणी, नाकाबंदी आणि कायदेशीर कारवाई केली. अवैध दारूविक्री, जुगार, शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थांची विक्री, अवैध वाळू वाहतूक, वाहनचोरी तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई
हातभट्टी दारूविरोधातील कारवाईत ५ हजार ३७७ लिटर गावठी दारू, रसायन, वॉश आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत ५ लाख ७ हजार ४१४ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशी व विदेशी दारूविक्रीविरोधात चार गुन्हे दाखल करून पाच जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारूच्या १२५ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत १० हजार ५०० रुपये आहे.
जुगार, शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात कारवाई
जुगारविरोधी मोहिमेत ७२ गुन्हे दाखल करून ८५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५१ हजार २५५ रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शस्त्र अधिनियमान्वये केलेल्या कारवाईत एक गावठी कट्टा आणि एक तलवार जप्त करण्यात आली. अंमली पदार्थांविरोधात १६ गुन्हे दाखल करून १६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी एक गुन्हा दाखल करून एका आरोपीवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून १६ लाखांहून अधिक दंड
वाहतूक शाखेने मोटार वाहन कायद्यान्वये १ हजार २९८ प्रकरणांत १० लाख ४४ हजार ४७० रुपये दंड वसूल केला. पोलीस ठाण्यांच्या स्तरावर आणखी ७७८ प्रकरणांत ५ लाख ८९ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण २ हजार ७६ प्रकरणांत १६ लाख ३३ हजार ५२० रुपये दंड वसूल करण्यात आला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३६ चालकांवर, तर मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ३५ जणांवर कारवाई करण्यात आली.
चोरीचा गुन्हा उघड; १४ ठिकाणी कारवाई
इलेक्ट्रिक मोटार व वायर चोरीचा एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला. या कारवाईत एक मोटारपंप आणि एक मोटारसायकल असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहिमेदरम्यान १०९ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ ठिकाणी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली. पानटपऱ्यांविरोधात कोटपा कायद्यानुसार १०८ प्रकरणांत कारवाई करण्यात आली.
१४० हरविलेल्या व्यक्तींचा शोध
हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याच्या मोहिमेत ६२ महिला, ४६ पुरुष, ३० मुली आणि दोन मुले अशा एकूण १४० व्यक्तींचा शोध घेण्यात आला. हद्दपार आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये सहा कारवाया करण्यात आल्या. याशिवाय समन्स व वॉरंट बजावणी, हॉटेल व ढाब्यांची तपासणी आणि सायबर गुन्ह्यांतील रक्कम रोखण्यासंदर्भातही कार्यवाही करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांच्या सहभागातून राबविण्यात आली. जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी एकाच वेळी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.







