एलसीबीच्या त्रिकुटने खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताला ३ तासात पकडले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील वय-२७ या तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली होती. जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या ३ तासात मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कासमवाडी परिसरात राहणारा ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील हा तरुण एका कंपनीत कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. ज्ञानेश्वर पाटील या तरुणाचे आपल्याच घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी किरकोळ वाद होते. दसऱ्याच्या दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास नाना पाटील हा घराजवळील एकता मित्र मंडळकडे उभा असताना दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने त्याच्या पोटावर, मांडीवर वार केले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ७०६/२०२५ बी.एन.एस कायदा कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांच्या शोधासाठी तत्काळ पथक रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड थांबून होते.
एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी हवालदार नितीन बाविस्कर, पोलीस नाईक किशोर पाटील, छगन तायडे, रविंद्र कापडणे यांचे पथक तयार करून रवाना केले होते. काही तासांतच गुन्हयातील मुख्य संशयीत आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटु वय-२७ रा.कासमवाडी जळगाव यांस शिताफिने नशिराबाद परीसरातुन ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाई कामी एमआयडीसी पो.स्टे जळगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.






