कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महिला हक्क आणि सुरक्षा या विषयावर व्याख्यान
महिलांनी आपल्या हक्कांची आणि सुरक्षिततेची माहिती करून घेणे आवश्यक: ॲड. महेश भोकरीकर

जळगाव: महिलांचे हक्क आणि त्यांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. स्त्रियांना लैंगिक छळापासून वाचवण्यासाठी विशेष कायदे आहेत आणि त्यांची माहिती महिलांना असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲड. महेश भोकरीकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिलांचे हक्क व सुरक्षा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम आज, बुधवारी, दि. २० रोजी विद्यापीठाच्या अधिसभागृहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सहायक लोक अभिरक्षक ॲड. शिल्पा रावेरकर, ॲड. श्रेया चौरसिया, आणि अधिसभा सदस्य व मुलींच्या वसतिगृह अधीक्षिका प्रा. किर्ती कमळजा उपस्थित होत्या.
ॲड. भोकरीकर यांनी पॉक्सो (POCSO), इन कॅमेरा चौकशी, भरपाईची तरतूद, आणि महिला अत्याचाराचे खटले जलद न्यायालयात चालविणे यासारख्या महिलांशी संबंधित कायद्यांमधील विविध तरतुदींवर सविस्तर माहिती दिली.
सहायक लोक अभिरक्षक ॲड. शिल्पा रावेरकर यांनी विनामूल्य विधी सेवा, सल्ला, आणि वकील मिळण्याच्या तरतुदींबद्दल सांगितले. तसेच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या 15100 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मोफत कायदेविषयक सल्ला घेता येतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी समाजात महिलांवर अत्याचार होणार नाहीत अशी व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्यांना न्यायालयात जाण्याची वेळ येणार नाही. त्यांनी उपस्थितांना आज शिकलेल्या कायद्यांचा अभ्यास करून गरजू व्यक्तींना मदत करण्याचा आणि आपल्यासमोर कुणाला त्रास होत असल्यास त्यांना निश्चित मदत करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले, तर प्रा. किर्ती कमळजा यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






