पातरखेडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी

महा पोलीस न्यूज । दि.५ ऑगस्ट २०२५ । जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या पातरखेडे येथील एकविरा माता आदिवासी मुलांच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमातून प्रसिध्द होत आहे. मात्र दि.२४ जुलै २०२५ रोजी ही लागण शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच तातडीने उपचार सुरु करण्यात आले होते. आता विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती संस्थेचे सचिव विजय पाटील यांनी दिली आहे.
संस्थेचे सचिव विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच त्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे आश्रमशाळेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने दाखल केले होते. वैद्यकिय पथकाने तातडीने उपचार सुरु केले. काही विद्यार्थ्यांना गोवर आजाराची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याने, त्यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. आजवरच्या उपचारांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असून, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले आहे.
नवीन गोवरसदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांची एकही नोंद झालेली नाही किंवा कोणत्याही विद्यार्थ्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट दिली असता, गोवर आजाराची साखळी खंडीत व्हावी म्हणून तूर्तास सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्याच्या मौखिक सूचना दिल्याने, विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी पालकांसोबत घरी सोडण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालय एरंडोल व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जळगाव येथे आजारी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी अहोरात्र काळजी घेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारादरम्यान दुध, फळे, नाश्ता व जेवणाची संपूर्ण व्यवस्था संस्थेचे सचिव विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांची काळजी घेतल्याने, त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून, पालकांशी संपर्क साधून गोवर आजाराविषयीचे गैरसमज दूर केले जातील व विद्यार्थी लवकरच आश्रमशाळेत पुढील शिक्षणासाठी उपस्थित होतील. विद्यार्थी येताच वैद्यकिय पथकाच्या सल्लाने, आश्रमशाळेत गोवर लसीकरण राबवत विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकिय तपासणी व लसीकरण केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव विजय पाटील यांनी दिली आहे.