पत्नीला खावटीपासून वंचित ठेवणाऱ्या पतीला अकरा महिन्यांची न्यायालयीन कोठडी
संसाराची राखरांगोळी झालेल्या मुलीला मंगळग्रह सेवा संस्थेने दिला आधार

अमळनेर | प्रतिनिधी | 08 जुलै – अजय पंडित राजपूत (रा. सानेनगर, तांबेपुरा) हे आरोपीचे नाव आहे. कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी अमळनेर न्यायालयाने २०२१ पासून त्यांची पत्नी नेहा विजय राजपूत व आठ वर्षाच्या मुलीला प्रति माह ३ हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले होते. मात्र अजय राजपूत यांनी गेल्या ४५ महिन्यांपासून खावटीची रक्कम जमा केली नव्हती. नेहा राजपूत यांनी कोर्टात धाव घेतली . अजय राजपूत खावटी भरत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या नावे अटक वॉरंट जारी करत ११ महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याकामी फिर्यादी नेहा राजपूत यांच्यातर्फे अॅड. सुरेश सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
नेहा राजपूत यांचे तालुक्यातील झाडी हे माहेर आहे .त्यांचे अजय यांच्याशी २७ एप्रिल २०१६ रोजी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यांना दीड वर्षानंतर एक मुलगीही झाली. मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर पती अजय राजपूत हा मद्य प्राशन करुन पत्नी नेहा यांना मारहाण करुन त्रास द्यायला लागला होता. त्रास सहन न झाल्याने नेहा माहेरी आल्या. मात्र आईवडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने व समाजाचा विचार करुन त्या पुन्हा सासरी आल्या. तरीही पतीची मारहाण सुरुच होती.
३ जून, २०२३ रोजी पतीने लाडकी दांडक्याने नेहा यांना अमानुषरित्या मारहाण केली होती. यात नेहा ह्या जबर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना धुळे येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही बाब ज्येष्ठ पत्रकार तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना समजताच त्यांनी नेहाला अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार केलेत. या मारहाणीबाबतही पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ही बाब न्याय प्रविष्ठ
मुलीच्या संसाराची राखरांगोळी होताना पाहून वडील वकील उदेसिंग पाटील यांचे मानसिक धक्क्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये निधन झाले. अर्थातच नेहाचे पितृछत्र हरपले. आई मोलमजुरी करुन मुलगी, मुलगा व नातीचा उदरनिर्वाह करु लागली. मात्र ग्रामीण भागातील तटपुंजी कमाई आणि महागाईच्या खाईत कसेतरी भागत होते. अशातच ही बाब धार्मिकतेसोबतच सामाजिकतेची भान असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नेहा राजपूत यांना संस्थेत सेवेकरी म्हणून ३ जुलै, २०२३ रुजू करून घेतले. येथील सेवाकार्यातून मिळालेल्या चांगल्या मानधनातून नेहा यांचा उदरनिर्वाह तर होतोच आहे, शिवाय मुलीचेही शिक्षण मंगळ ग्रह सेवा संस्था करीत आहे.