शहर पोलिसांची कामगिरी : दुचाकी चोरताच काही तासात ३ दुचाकीसह तिघे गजाआड!
महा पोलीस न्यूज । दि.१० नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावात नियमीत नाकाबंदी राबवण्यात येत आहे. त्यातच शनिवारी रात्री गस्तीवर असलेल्या शहर पोलीस ठाण्यातील पथकाने चोरीच्या ३ दुचाकींसह ३ चोरट्यांना पकडले आहे. तिघांकडून ३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
जळगांव जिल्हयात वाढलेल्या मो.सा. चोरीच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी रात्रगस्ती ही सतर्क करणेबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहे. दिलेल्या सुचना व केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव शहर पो.स्टे.चे गुन्हे शोध पथक शनिवारी रात्री गस्तीवर होते.
गेंदालाल मिल परिसरात रात्रगस्ती दरम्यान संशय आल्याने ३ मो.सा. चालक यांना थांबवुन चौकशी तसेच मोटारसायकलचे कागदपत्रांचे मागणी केली असता तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. संशयित हे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पथकाने त्यांचा पळण्याचा प्लॅन फसवला आणि ३ मो.सा. सह त्यांना ताब्यात घेवुन जळगांव शहर पोलीस ठाण्यात आणले. तिघांची विचारपुस व मो.सा.ची चेसीस क्रमांकावरुन माहीती घेतली असता सदर मो.सा. यांना लावलेल्या नंबर प्लेट या फेक असल्याचे व त्या मो.सा.ली चोरीच्या असल्याचे समजले.
तिघांना केली अटक
पोलिसांनी तिघांची नावे विचारली असता त्यांनी जाफर जाबाज पठाण वय-२८ रा.रवांजा बु. एरंडोल, पितांबर रतन सोनवणे वय-२३, प्रवीण भाईदास कोळी वय-२३ रा.नवगाव विखरण असे सांगितले. धरणगांव पोलीस स्टेशनला दाखल गुरनं ५६/२०२३ आणि गुरनं २६८/२०२४ हे गुन्हे उघड झाले आहेत. महामार्गालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून ते जळगावात विक्रीसाठी आणत होते.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, हवालदार उमेश भांडारकर, संतोष खवले, सतिश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, राहुल पांचाळ आदींचा समावेश होता.