त्रंबकेश्वर मंदिरात बनावट ऑनलाईन दर्शन पासचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

त्रंबकेश्वर मंदिरात बनावट ऑनलाईन दर्शन पासचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद
त्रंबकेश्वर (प्रतिनिधी) – त्रंबकेश्वर जार्तिलींग मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शन पासच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणारी टोळी त्रंबकेश्वर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीने बनावट नाव, पत्ता आणि ओळखपत्र वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन देणगी दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार केल्याचे उघड झाले आहे.
मंदिरात मोफत आणि देणगी अशा दोन प्रकारच्या दर्शन रांगांची व्यवस्था असून, देणगी दर्शनासाठी दर व्यक्ती २०० रुपये आकारले जातात. यासाठी ऑनलाईन पास प्रणालीही उपलब्ध आहे. काही दिवसांपासून माध्यमांमध्ये या पासचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत त्रंबकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व ई-मेल आयडीच्या इतिहासातून त्यांनी बनावट ऑनलाईन पास मिळवून त्याची विक्री ७०० ते १००० रुपयांत केल्याचे उघड झाले. त्यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक १०२/२०२५ नुसार संघटीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात आतापर्यंत एकूण १६४८ बनावट पास काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, सुमारे ५००० भाविकांना या टोळीने फसवले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
अटक आरोपींची नावे व पत्ते पुढीलप्रमाणे –
-
दिलीप नाना झोले, रा. पेगलवाडी, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक
-
सुदाम राजु बदादे, रा. पेगलवाडी, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक
-
समाधान झुंबर चोथे, रा. रोकडवाडी, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक
-
शिवराज दिनकर आहेर, रा. निरंजनी आखाड्याजवळ, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक
-
मनोहर मोहन शेवरे, रा. रोकडवाडी, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक
ऑनलाईन दर्शन पास प्रणालीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने सुधारणा करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्रंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक गावित, पोहवा जाधव, पोहवा मुळाणे, पोशि ठाकरे, पोशि बोराडे आणि पोशि राठोड करीत आहेत.