खळबळजनक : पोलीस ठाण्यात चार गोळ्या झाडत कर्मचाऱ्याने संपविले जीवन
महा पोलीस न्यूज | ५ एप्रिल २०२४ | राज्य पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना काही कमी होत नाही. नाशिक आणि मुंबई येथील घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खडकी परीसरात असलेल्या लोहिया नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःवर ४ गोळ्या झाडून घेत जीवन संपाविल्याची घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खडकी परीसरात असलेल्या लोहिया नगर पोलीस ठाण्यात भारत दत्ता आस्मर हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. लोहिया नगर पोलीस चौकीत आल्यावर ते स्वतःसोबत आपली बंदूक सोबत घेऊन वरती असणाऱ्या रेस्ट रूममध्ये आरामासाठी गेले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आल्याने सर्वांनी त्याकडे धाव घेतली. सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांची काय झाले म्हणून पाहणी केली असता भारत आस्मर यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोळीबारामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे.
भारत दत्ता आस्मर हे गेल्या १० वर्षापासून पोलीस दलात सेवा बजावत आहेत. मागील काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती समोर आली असून तणावाचे कारण समोर आलेले नाही. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेची आता विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.