CrimeOther

गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकासह, उपनिरीक्षक अडचणीत!

महा पोलीस न्यूज । दि.२१ जून २०२५ । सीएसआर फंडाच्या माध्यमातून शेततळे कामाचे कंत्राट मिळवून देतो असे आमिष दाखवून माजी माहिती आयुक्त तथा पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील व सहकाऱ्यांनी अजय बढे यांची ४५ लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाचे दिले होते. दरम्यान, आरोपींचा बचाव करण्याचा इराद्याने रामानंदनगर पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल करण्यात विलंब केल्याप्रकरणी तसेच आर्थिक गुन्हे शाखेने तक्रार अर्जाची चौकशी करताना आरोपींचा बचाव करण्यासाठी प्रक्रिया राबविल्याचा आरोप करीत अजय बढे यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तक्रारीची दखल घेत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांनी तपास अधिकाऱ्यांना सविस्तर खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात पाटबंधारे विभागाकडून कोट्यवधी रुपयांचे शेततळ्यांचे कामे करण्यात येत आहेत. या शेततळे कामापैकी काही कामांचा ठेका सीएसआर फंडातून मिळवून देतो असे आमिष दाखवून पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व सहकाऱ्यांनी अजय बढे यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. यासाठी अजय बढे यांना चंदिगड, मुंबई येथे पाठवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आपली फसवणूक होत असण्याचे लक्षात आल्याने अजय बढे यांनी तत्कालीन पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांच्याकडे तक्रार केली होती.

तक्रारदार अजय बढे यांच्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक राजकुमार यांनी या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी आरोपींना म्हणणे मांडण्याची वेळोवेळी संधी देवून आरोपींचे बचाव होईल असा अहवाल पोलिस अधिक्षक यांचेकडे सादर केला‌ होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या अहवाला विरोधात अजय बढे यांनी न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणातील संशयीत असलेले पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन‌ व‌ त्यांचे साथीदार सहकारी यांचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका दाखल केली होती.

गुन्हा दाखल करण्यास विलंब
न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी करून व्ही.डी.पाटील,कार्यकारी अभियंता, गोकुळ श्रावण महाजन, ललित चौधरी, पंकज नेमाडे, सूर्यविरसिंग चौहान, सनदी लेखापाल सुहास भट, पवन कोलते, व्ही.के.जैन यांच्या विरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले होते. मात्र, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व विद्यमान महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील पोलीस उपअधिक्षक‌ राजेंद्र कुटे यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यास विलंब केला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी.पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.

पोलीस प्राधिकरणात तक्रार
संशयित आरोपी हे उच्चपदस्थ असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी सुरुवातीच्या चौकशीत व रामानंद नगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने अजय बढे यांनी विभागाय पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागाय पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिक यांनी हे प्रकरण राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांच्याकडे हस्तांतरीत केले.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
न्यायालयाने याबाबत आव्हान फेटाळून अजय बढे यांची फिर्याद नोंदवून घेण्याचे पोलिसांना आदेश दिल्याने दि.३ डिसेंबर रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी व्ही.डी.पाटील हे मोठे प्रस्थ असून ते राज्य नाहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त देखील होते. त्यांचे जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत स्नेहपूर्ण संबंध आहेत. याप्रकरणात सुहास भट, पवन कोलते, व्ही. के.जैन हे तिघेही सनदी लेखापाल असून गोकुळ महाजन हे तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाघुर धरण विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. व्ही. डी. पाटील यांचे परिचित सूर्यवीर चौहान हे गोल्ड रिव्हर कंपनीचे संचालक असून ललित चौधरी व पंकज नेमाडे हे दोघेही व्ही.डी.पाटील यांचे निकटवर्तीय असल्याचे अजय बढे यांच्या फिर्यादित नमूद आहे.

खुलासाला दिले उत्तर, संशयितांना अंतरिम जामीन
गुन्ह्यानंतर संशयितांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर कामकाज होऊन न्यायालयाने संशयितांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच तक्रारदार अजय बढे यांच्या तक्रारीची दखल घेत राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांचेकडे सुनावणी झाली. रामानंद नगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सद्या महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पोलिस उपअधिक्षक पदी कार्यरत असलेले राजेंद्र कुटे तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे‌ यांना प्राधिकरणाने सविस्तर खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. दोघांनी आपला खुलासा सादर केल्यानंतर त्यावर पुन्हा अजय बढे हे दि.२४ जून रोजी आपले म्हणणे सादर करणार आहे.

न्यायव्यवस्थेवर मला विश्वास : अजय बढे
संपूर्ण प्रकरणातील सर्व संशयीत दिग्गज असून त्यांचे मोठे प्रस्थ आहे. या प्रकरणातील संशयित पंकज नेमाडे याने खोटे आमिष दाखवून हडपलेले पैसे आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीनंतर मला खात्यावर पाठवले हा सर्वात मोठा पुरावा आहे. सर्वांनी मिळून माझी केलेली फसवणूक उघडी पडली असून सत्य लवकरच समोर येईल. मला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे युवा उद्योजक व फिर्यादी अजय बढे यांनी सांगितले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button