पुण्यात मोक्कासह गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

पुण्यात मोक्कासह गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी अटकेत
बंडगार्डन पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन वर्षांपासून होता फरार
पुणे,बंडगार्डन पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि मोक्का यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक केली आहे. विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटकेत घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेली दोन वर्षे फरार होता.
२०१७ पासून विशाल भोले याने एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्याने आपले लग्न झाले नसल्याचे खोटे सांगत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. पीडित महिला दोनदा गर्भवती राहिल्यानंतर तिची संमती न घेता गर्भपात घडवून आणल्याचे आरोप आहेत.
महिलेने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आरोपीने तिला मारहाण करून धमकावत जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर गुन्ह्यांचा इतिहास:
विशाल भोले याच्यावर यापूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खून, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो या सर्व गुन्ह्यांप्रकरणी फरार होता.
गुप्त माहितीवरून अटक:
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकातील अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, निरीक्षक निलकंठ जगताप, संपतराव राऊत यांच्या समन्वयातून हे ऑपरेशन पार पाडले.
ही अटकेची कारवाई पुणे पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील ठोस भूमिका आणि कामगिरी अधोरेखित करणारी ठरली आहे.