पुण्यात हनी ट्रॅपचा नवा बळी: प्रफुल्ल लोढाविरोधात अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल, वाचा सविस्तर..

महा पोलीस न्यूज । दि.२५ जुलै २०२५ । जळगाव येथील रहिवासी प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीच्या आमिषाने एका 36 वर्षीय विवाहित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईत अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि हनी ट्रॅप प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या लोढाच्या अडचणी या नव्या तक्रारीमुळे वाढल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २७ मे २०२५ रोजी रात्री पुणे-बेंगलोर महामार्गावरील बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये घडला. पीडित महिलेने सांगितले की, लोढाने तिच्या पतीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये बोलावले. तिथे त्याने शारीरिक संबंधांची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर लोढाने “तुझी नोकरी घालवेन” अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर १७ जुलै २०२५ रोजी पीडितेने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, ज्यावरून लोढाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील गंभीर आरोप आणि अटक
प्रफुल्ल लोढा (वय ६२) याच्यावर यापूर्वी मुंबईतील साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांतही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर १६ वर्षीय अल्पवयीन मुली आणि तिच्या मैत्रिणीवर नोकरीच्या आमिषाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. याशिवाय, मुलींचे अश्लील छायाचित्र काढणे, त्यांना डांबून ठेवणे आणि धमकावणे असेही आरोप त्याच्यावर आहेत. साकीनाका पोलिसांनी ३ जुलै रोजी त्याच्याविरोधात पोस्को कायदा, बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले, तर १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा नोंदवला. लोढाला ५ जुलै २०२५ रोजी साकीनाका पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या ताब्यात आहे.
लोढाचा विवादास्पद भूतकाळ
प्रफुल्ल लोढा हा जळगावमधील एका प्रभावशाली नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात होता. मात्र, त्याने नंतर त्या नेत्यावर गंभीर आरोप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली होती, परंतु पाचच दिवसांत त्याने माघार घेतली. स्वतःला ‘आरोग्यदूत’ आणि समाजसेवक म्हणवणाऱ्या लोढाविरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती आहे. या नव्या प्रकरणाने त्याच्या गुन्ह्याची मालिका समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लोढाच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही शोध घेतला जात आहे.