क्या बात हैं.. शहरात एकाच दिवशी ४ सोरट, जुगार अड्ड्यावर छापे!
महा पोलीस न्यूज | १७ मे २०२४ | जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सट्टा, पत्ता, जुगार, रॉलेट गेम, गॅस भरणा, सोरट, दारू विक्री, भंगार, रेशन धान्य काळाबाजार, कुंटनखाने, गुटखा, अंमली पदार्थ विक्री, वाळू, मुरूम, लाकूड वाहतूक सर्वच बिनधास्त सुरु असताना जळगाव शहर पोलिसांनी एकच दिवशी ४ अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
जळगाव शहरात आणि विशेषतः ग्रामीण भागात अवैध धंद्यांना मोठे पेव फुटले आहे. काही ठिकाणी तर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अवैध धंदे सुरु आहेत. अनेकदा स्थानिक पोलीस कारवाई करतात मात्र ती केवळ दिखाव्यापुरते ठरते. बऱ्याचदा तर अवैध धंद्यांवर कारवाईचा ठेका एलसीबीनेच घेतला असल्याचे दिसते. अवैध धंद्यांची चेवचेच झाली तरी बोंब एलसीबीच्या नावेच उठते. स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नावच कुणी घेत नाही.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, बंदोबस्त आटोपताच जळगाव शहर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. शहर पोलिसांनी एकाच दिवसात दोन सट्टापेढी आणि २ सोरट खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रविंद्र बागुल यांच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुनील पाटील, हवालदार उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, तेजस मराठे, रतन गिते यांच्या पथकाने निलम वाईन शॉपजवळ छापा टाकत सोरट घेणाऱ्या रियाज रज्जाक पटेल रा.गेंदालाल मील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोरट कार्ड आणि १२२० रुपये हस्तगत करण्यात आले. पथकाने जुने बस स्थानक मागील गल्लीत छापा टाकत सोरट घेणाऱ्या कपील सिध्दार्थ शिवराळे रा.गेंदालाल मील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोरट कार्ड आणि ११७० रुपये हस्तगत करण्यात आले.
डीबी पथकाने पथकाने जुने बस स्थानक मागील गल्लीत छापा टाकत टपरीच्या आडोश्याला सट्टा घेणाऱ्या चंद्रकांत गणा सोनवणे रा.हरिविठ्ठल नगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सट्याच्या चिठ्ठ्या, पेन, कार्बन आणि ६४० रुपये हस्तगत करण्यात आले. पथकाने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे स्टेशन भिंतीच्या आडोशाला छापा टाकत सट्टा घेणाऱ्या सुनील पंढरीनाथ दिदुक रा.लक्ष्मी नगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सट्याच्या चिठ्ठ्या, पेन, कार्बन आणि १४४० रुपये हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसात ४ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शहरात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली असून अवैध धंदे चालक, मालक घाबरून आहेत. जळगावकर नियमीत सर्वच अवैध ठिकाणी अशा कारवाईची अपेक्षा ठेवून आहेत.