पिंप्राळा हुडको खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी केली अटक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्राळा हुडको परिसरात दि.१९ रोजी एका तरुणाची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली होती. खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना रामानंद नगर पोलिसांनी कानळदा रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील मुकेश शिरसाठ या तरुणाची दि.१९ रोजी जुन्या वादातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आधीच ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, उर्वरित दोन आरोपी पसार झाले होते. याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजेंद्र गुंजाळ यांनी टीम तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सांगितले होते.
कानळदा रस्त्यावरील शेतातून केली अटक
गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पसार झालेले आरोपी जळगाव शहरातील कानळदा रस्ता, बडाजटाधारी महादेव जवळ एका शेतात लपून असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तेथे जाऊन सदर आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, राहुल ऊर्फ प्रेम शांताराम सोनवणे (वय २१) आणि शैलेश ऊर्फ पंकज शांताराम सोनवणे (वय २६), दोघेही रहणार बौध्द वसाहत पिंप्राळा हुडको, जळगांव यांना अटक करण्यात आली.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील हवालदार संजय सपकाळे, इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली आहे.