जळगावमध्ये घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

जळगावमध्ये घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद!
12.50 लाख किमतीचे सोने व चांदी जप्त ,रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव प्रतिनिधी – शहरातील रामानंद नगर परिसरात एका बंद घरात झालेल्या १२.५० लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून १५९.९२ ग्रॅम सोने आणि ४५० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी रामानंद नगर पोलिसांनी केली असून, गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि विविध माहिती तंत्राचा उपयोग करून करण्यात आला.
फिर्यादी पराग जगन्नाथ चौधरी (वय ४८, व्यवसायिक, रा. रामानंद नगर, जळगाव) यांच्या बंद घरात ६ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ ते ३ दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाट आणि डब्यांमधून २२ तोळे सोने, ४५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १६,५०० रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील आणि शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका मोपेडस्वार व्यक्तीचा संशयास्पद हालचालींचा अंदाज आला. जळगाव शहरात चौकशी केली असता तो स्थानिक नसल्याचे आढळले. पोलिसांनी पुढील टोलनाक्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पारोळा टोलनाक्यावर तो दिसला. माहिती काढल्यानंतर आरोपी साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल शेख खलील शेख (वय २०, रा. पश्चिम हुडको, चाळीसगाव रोड, पवन नगर, धुळे) हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी धुळे, अमळनेर, पारोळा येथे शोधमोहीम राबवली.
२८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीने सांगितले की, चोरीचे सोने त्याने साथीदारांच्या मदतीने वितळवले. त्याच्या घरातून चोरी केलेले चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. पवनराज संजय चौधरी (वय २८, रा. हत्ती गल्ली, पारोळा) सागर वाल्मीक चौधरी (वय ३०, रा. आझाद चौक, पारोळा) केशव बाळू सोनार (वय ३६, रा. शाहू नगर, अमळनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपीवर याआधी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे, ता. मालेगाव, जि. नाशिक – भा.दं.वि. कलम ४५७, ३८० चाळीसगाव रोड पोलीस ठाणे, धुळे – भा.दं.वि. कलम ३०७, ३२४ प्रमाणे या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत .
ही कारवाई रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, हवालदार जितेंद्र राजपुत, हवालदार इरफान मलिक, हवालदार सुशील चौधरी, हवालदार प्रवीण भोसले, नाईक देवानंद साळुखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी, प्रवीण सुरवाडे आदींनी केली.