नात्याला कलंक : शाळकरी मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एका १५ वर्षीय मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार जळगाव आणि उत्तराखंड येथे घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील शासकीय सेवेत नोकरीला असलेल्या एका महिलेचा घटस्फोट झाला असून त्यांनी उत्तराखंड येथील व्यक्तीशी पुनर्विवाह केला आहे. गेल्या वर्षी पीडित मुलगी, आईसह दिवाळीच्या काळात उत्तराखंड येथे गेली होती. उत्तराखंड येथून परत जळगावात आल्यावर साधारणतः तीन महिन्यांनी पीडित मुलीला तिच्या सावत्र वडिलांनी व्हॉट्सऍपद्वारे ती अंघोळ करीत असल्याचा व्हिडिओ पाठवला. मुलीने त्यांना जाब विचारला असता त्यांनी अश्लील शब्दप्रयोग केला. मुलीने त्यांचा नंबर ब्लॉक करीत भीतीपोटी कुणालाही काहीही सांगितले नाही.
फेब्रुवारी २०२५ मध्ये पुन्हा पीडित मुलगी आई आणि मामासह उत्तराखंड येथे गेले होते. दुपारी आई आणि मामा कामानिमित्त बाहेर गेले असल्याची संधी साधून तिच्या सावत्र वडिलांनी अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एप्रिल २०२५ आणि ऑगस्ट २०२५ मध्ये जळगावातील घरी पीडित मुलीसोबत पुन्हा तिच्या वडिलांनी धमकी देत अत्याचार केला.
ऑगस्टमध्ये आईला हा प्रकार समजला असता सावत्र वडिलांनी पत्नी आणि मुलीला मारहाण केली आणि बाहेरगावी निघून गेले. दि.१५ नोव्हेंबरला घरी आल्यावर पुन्हा सावत्र वडिलांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या आईने विरोध करून मुलीला आजीकडे पाठवले आणि पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






