
राष्ट्रीय महामार्गाच्या भूमी अधिग्रहणातील गोंधळ : आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक
खामखेडा (प्रतिनिधी) │मुक्ताईनगर–पुरनाड फाटा दरम्यान इंदूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून सुरू असलेला वाद आज मंगळवारी अधिक चिघळला. सकाळी पोलिस बंदोबस्तात पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले, त्याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्यासाठी आंदोलन छेडले. पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांना उचलून नेताच आमदार प्रा. चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत रास्तारोको आंदोलन छेडले. त्यानंतर पोलिसांनी आमदार पाटील यांनाही ताब्यात घेतले.
महामार्गाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या असून, त्यांना अपेक्षित मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुलाचे काम सुरू होताच शेतकरी काम बंद करण्यासाठी एकत्र जमले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच आमदार पाटील यांनी काम त्वरित थांबवण्याची मागणी लावून धरली. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त होत आमदारांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्तारोको आंदोलन सुरू केले. अधिकाऱ्यांनी विनंती करूनही ते आंदोलन मागे घेण्यास तयार न झाल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.