तरुणाला लुटले : महिलेसह तिघे जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज | १२ मार्च २०२४ | जळगाव शहरातील अग्रवाल चौफुलीजवळ दि.१० मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तिघांनी एका दुचाकीस्वार तरुणाला लुटले होते. जिल्हापेठ पोलिसांनी याबाबत माहिती काढून तिघांना अटक केली आहे. पथकाने त्यांच्याकडून लुटीसाठी वापरलेली दुचाकी आणि हिसकावलेला मोबाईल हस्तगत केला आहे.
निमखेडी येथील अक्षय विलास शेलार हे दि.१० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मित्राचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे जात होते. जळगांव शहरातील अक्सॉन ब्रेन हॉस्पिटल, जवळील मोहीत चायनीज जवळून जात असताना दोन पुरुष व एक महीला असे दुचाकीवर आले. तरुणाला थांबवून तुला काही मदत हवी का असे विचारले, त्या वेळी फिर्यादी यांनी मला काही मदत नको, असे बोलू लागले असता त्यांनी फिर्यादी जवळ येवून २०० रुपयांची मागणी केली, परंतू त्यांच्याजवळ पैसे नसल्याने दुचाकीवर बसलेल्या महीलेने फिर्यादी यास चापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, व काही कळण्याचे आत त्याचे हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून अग्रवाल चौकाकडे पळुन गेले.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयात गुन्हे शोध पथकातील पो.ना. जुबेर तडवी, अमितकुमार मराठे अशांना गुप्त बातमी मिळाल्याने त्यांनी सर्व हकीकत पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना कळवून त्यांनी गुन्हे शोध पथकातील हवालदार सलीम तडवी, मिलींद सोनवणे, तुषार पाटील, वैशाली सादरे, साहेबराव खैरनार अशांचे पथक तयार करुन मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आरोपीचा शोध घेत योग्य ती कार्यवाही करा असे आदेश केले होते.
पथकाने शेख अजरुद्दीन शेख हुस्नोद्दीन ऊर्फ भुतपलीत वय-३२ रा. शाहुनगर, मंगल सोमा सोनवणे वय-२८ रा.पिंप्राळा हुडको यांना पिंप्राळा हुडको परिसरातून दि.११ रोजी ताब्यात घेवून अटक केली. तसेच आज दि.१२ रोजी गुन्ह्यातील महीला संशयीत आरोपी जया जुलाल जाधव, वय २८ रा.सिध्दार्थ नगर हिस अटक केलेली आहे. आरोपीतांकडून हिसकावून नेलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.