रुतुजा पंकज चौधरी हिने मिस पुणे २०२५–२६ चा मुकुट पटकावला

रुतुजा पंकज चौधरी हिने मिस पुणे २०२५–२६ चा मुकुट पटकावला
अमळनेर | प्रतिनिधी तालुक्यातील अमळगाव येथील डॉ. पंकज सुरेश चौधरी यांची कन्या असलेल्या १९ वर्षीय रुतुजा पंकज चौधरी हिने २६ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित मिस पुणे २०२५–२६ सौंदर्यस्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत अमळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या सौंदर्यस्पर्धेत एकूण १२ गुणवान स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. रुतुजाने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने, बुद्धिमत्तेने व सोज्वळ व्यक्तिमत्त्वाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत सेकंड रनर-अप स्थान मिळवले. तसेच तिने मिस पुणे पेजंट हा मानाचा किताब पटकावला.
या यशामुळे रुतुजा पंकज चौधरी अधिकृतपणे २०२५–२६ या कालावधीसाठी ‘मिस पुणे’ हा किताब धारण करणार आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कुटुंबीयांसह अमळगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या मेहनत, चिकाटी आणि समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, रुतुजाने यापूर्वी झारा (ZARA) या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी रन-वे मॉडेल म्हणून काम केले आहे. तसेच यूट्यूबवरील स्टार म्युझिक या ब्रँडअंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘भूल जावा’ या गाण्यातही तिने अभिनय केला आहे. तिचा हा प्रवास मॉडेलिंग व मनोरंजन क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची नांदी ठरत आहे.
तिच्या या यशाबद्दल माजी आमदार शिरीषदादा चौधरी, समस्त कल्याणकारी बहुद्देशीय संस्था, अमळगाव, तसेच महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ, अमळनेर यांच्या वतीने रुतुजा चौधरी हिचे अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सौंदर्यासोबतच उद्देश, कला आणि व्यक्तिमत्त्व यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या स्पर्धेने रुतुजाच्या प्रेरणादायी व उज्ज्वल प्रवासाची एक आशादायक सुरुवात घडवून आणली आहे.






