२६/११ चे ‘रिअल हिरो’ सदानंद दाते आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक

२६/११ चे ‘रिअल हिरो’ सदानंद दाते आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक
रश्मी शुक्ला यांची घेणार जागा; ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने वर्षाच्या अखेरच्या दिवशी पोलीस दलात मोठा फेरबदल केला असून, ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) माजी प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्ती केली आहे. विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला ३ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यानंतर दाते या पदाची सूत्रे हातात घेतील.
राज्यातील आगामी महापालिका निवडणुका आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहता, केंद्र सरकारकडून दाते यांना मुदतपूर्व महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सदानंद दाते यांचा कार्यकाळ आता २०२७ च्या अखेरपर्यंत असेल, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलीस महासंचालकांना किमान दोन वर्षांचा निश्चित कार्यकाळ मिळणे आवश्यक आहे.
सदानंद दाते यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक आणि कडक शिस्तीचे अधिकारी अशी आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्याशी त्यांनी प्रत्यक्ष लढा दिला होता. ग्रेनेडच्या हल्ल्यात जखमी होऊनही त्यांनी दहशतवाद्यांना रोखून धरले. या शौर्यासाठी त्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले आहे. त्यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे), आणि मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलाला एक सक्षम आणि अनुभवी नेतृत्व मिळाले आहे.






