पैलाड येथील सागर पाटील सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

पैलाड येथील सागर पाटील सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार
अमळनेर : शहरातील पैलाड भागातील सागर संजय पाटील (वय २५) याला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या आदेशानुसार सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सागर पाटील याच्यावर पिस्टलने गोळीबार करून लूटमार, दरोडा, मोटरसायकल अडवून लूट, जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दमदाटी अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वर्तणुकीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये सागर पाटीलला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव डीवायएसपी यांच्याकडे सादर केला. डीवायएसपी यांनी साक्षीदारांचे जबाब व गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्याकडे पाठवला.
शासन व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी सागर संजय पाटील याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.