सिंगनूरच्या प्रा. संजय मोरे यांना राष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मान

सिंगनूरच्या प्रा. संजय मोरे यांना राष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मान
रावेर तालुक्यातील सिंगनूर या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी प्रा. संजय मोरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हरियाणा राज्यातील कर्नाल येथे ‘राष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून निवडक ३० व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातून प्रा. संजय मोरे हे एकमेव मानकरी ठरले.
हा पुरस्कार वितरण सोहळा कर्नाल येथील नूर महल इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पार पडला. प्रा. संजय मोरे हे अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन, सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना शाल, बुके आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मायाताई मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष रणज्योत सिंह होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अँटी करप्शन मानव अधिकार सुप्रीमो नरेंद्र अरोरा उपस्थित होते. याशिवाय चित्रपट अभिनेते दिलीप ताहील, अभिनेत्री सुधा चंदन आणि ‘आशिकी’ फेम राहुल रॉय हे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून हजर होते. राष्ट्रीय चेअरमन प्रवीण कुमार बन्सल, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निशा गुप्ता, राष्ट्रीय संचालक राम नारायण साहू यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
प्रा. संजय मोरे यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, या पुरस्काराने त्यांच्या कार्याला मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी न्यायाधीश बी. ए. कोळी, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांचे मित्रपरिवार, सहकारी आणि सिंगनूर गावातील नागरिकांनीही त्यांचा सत्कार करत आनंद व्यक्त केला.