Education

जळगावात अवरतले संसद, मोदींसह केंद्रीय मंत्र्यांनी घेतला चर्चेत सहभाग!

विद्यार्थ्यांनी घेतले संसदेचे धडे, नेहरू युवा केंद्रातर्फे पडोस युवा संसदचे आयोजन

महा पोलीस न्यूज | २ मार्च २०२४ | सध्या लोकसभा निवडणुकाजवळ येत असताना जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात संपूर्ण संसद भवनच शुक्रवारी उतरले होते. संसद भवनाचे कामकाज कळावे, युवकांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा या हेतूने नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो.

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शुक्रवार दि.१ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात जिल्हास्तरीय पडोस युवा संसद २०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना व सामजिक विज्ञान प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.विद्यालयाचे सहकार्य लाभले होते. प्रसंगी अध्यक्षस्थानी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.रक्षा खडसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उमंगसृष्टी फाउंडेशनच्या संपदा उन्मेष पाटील, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ.विनोद पाटील, सामाजिक शास्त्र विभागाचे संचालक प्रा.अजय पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे, डॉ.उमेश गोगडीया, अग्रणी बँकेचे प्रनवकुमार झा, विद्यापीठ सदस्य निरा जोशी, राजेंद्र नन्नवरे, आकाशवाणी कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, आकाशवाणी सहायक आयुक्त दिलीप म्हसाने, शिवाजी पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी, पडोस युवा संसद कार्यक्रम कशा पद्धतीने राबविण्यात आला. देशात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून या उपक्रमाव्दारे युवकांना अधिक सक्षम करीत त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी चालना देण्यात येते असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन युवा स्वयंसेवक तेजस पाटील यांनी तर आभार लेखापाल अजिंक्य गवळी यांनी मानले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभा आणि सर्व निवडणुकीत आपण मतदान करायलाच हवे आणि इच्छा नसेल तर ‘नोटा’वर मतदान करा पण आपला हक्क बजवा. मी देखील अशाच युथ पार्लमेंट स्पर्धेत सहभागी होत पुढे आलो आहे. परीक्षा देण्यापेक्षा निवडणूक लढविणे अधिक कठीण असते. परीक्षेचा निकाल स्वतःच्या मन, अभ्यासावर निश्चित असतो तर निवडणुकीचा निकाल जनतेच्या मन, अभ्यासावर निश्चित असतो, त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. देशाची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन नेण्यासाठी जळगाव जिल्ह्याचा विकासदर १७.१ टक्का असणे आवश्यक आहे. दरवर्षी तो दर वाढणे गरजेचे आहे. १.१ गेल्या १५ वर्षाचा विकासदर आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट मांडा तुम्हाला विरोध होणारच, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी खा.रक्षा खडसे म्हणाल्या की, देशाला घडविण्यात युवकांचा मोठा वाटा आहे. देशात सध्या संसदेत ३० ते ४० टक्के युवक असून महिलांचा आणि ज्येष्ठांचा सहभाग आहे. समाज घडविण्यात युवकांचा मोठा वाटा असतो. दरवर्षी केंद्राच्या माध्यमातून आयोजित संसद भरविण्यात येते त्यातून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते. राज्याच्या स्तरावर देखील असा एका उपक्रम राबवायला हवा. समाजात सध्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या जबाबदारी याबाबत अनेक संभ्रम आहेत. नागरिक प्रत्येकाकडून एक सारखीच अपेक्षा ठेवतात. देशाच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी आणि एखादा कायदा लागू करण्यासाठी संसदेत विचार होतो परंतु आजची परिस्थिती अशी आहे की गावात गेले तर आमचे ड्रेनेज साफ झाले नाही, रेशन मिळत नाही, पेन्शन आली नाही अशा तक्रारी नागरिक मांडतात. केंद्राशी संबंधित अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असतो. केवळ राजकारणी लोक देश नाही चालवू शकत तर प्रशासन देखील त्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. दोघे सोबत चालले तरच ते काम होऊ शकते. युवकांनी राजकारणात यायला हवे. तुम्हाला राजकीय वारसा नसला तरी तुम्ही राजकारणात येऊ शकतात. आजकाल देशात तशी परिस्थिती आहे. तुमच्यात काहीतरी करण्याची धमक असली तर सर्व करता येते. एखाद्या राजकीय कुटुंबातून तुम्हीआले तरी समाज तुम्हाला स्विकारेलच असे नसते. आडनाव आणि ओळखीमुळे लोक तुम्हाला एकदा स्वीकारू शकतात मात्र तुम्ही काही केले नाही तर समाज तुम्हाला स्वीकारत नाही. महाराष्ट्राचे राजकारण सध्या केवळ आरक्षणावर फिरते आहे. आरक्षण गरजेचे आहे का यावर सर्व युवकांनी विचार करणे आवश्यक आहे. एखाद्या महापुरुषाची जयंती साजरी करणे म्हणजे डिजे लाऊन नाचणे नव्हे तर त्यांच्या विचारांवर अंमल करणे आहे, असे खा.रक्षा खडसे यांनी सांगितले.

उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, तेजस धनंजय पाटील, कल्पना पाटील, शुभांगी फासे, पल्लवी तायडे, रोहन अवचारे, अनिल बाविस्कर, सागर नागणे, परेश पवार, राहुल वाघ, आनंदा वाघोदे, मनोज पाटील, मुकेश भालेराव, तुषार साळवे, साहिल साळवे, चेतन पाटील, अक्षय निकम आदींसह इतरांनी परिश्रम घेतले.

व्यासपीठावर संसदेत गदारोळ, आवाजी मतदान
नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवा पडोस संसद कार्यक्रमात व्यासपीठावर संसद भवन तयार करण्यात आले होते. संसद सभापती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, विरोधी पक्षनेते अशांच्या उपस्थितीत सर्व कामकाज कसे होते हे दाखविण्यात आले. राष्ट्रगीत, शोक प्रस्ताव, नवीन सदस्यांचा शपथविधी, आवाजी मतदान, विरोध, संसद तहकूब असे सर्व कामकाज पाहताना प्रत्यक्षातच सुरू असल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button