विठ्ठल नामाची शाळा भरली… पहा व्हिडिओ

विठ्ठल नामाची शाळा भरली… पहा व्हिडिओ
मुक्ताईनगर तालुक्यात आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांची दिंडी मिरवणूक, भक्तिरसात न्हाल्या शाळा
मुक्ताईनगर : आषाढी एकादशी निमित्त मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील विविध शाळांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषात दिंडी सोहळ्याचे आयोजन केले.
शाळांच्या प्रांगणात आणि परिसरात ‘हरी बोल हरी बोल’, ‘माऊली माऊली’, ‘पांडुरंग हरी’ च्या गजराने वातावरण भारावून गेले होते. विद्यार्थ्यांनी फेटे, उंच टोपी, रंगीबेरंगी साडी, धोतर, अंगावर फेटा, हातात टाळ- मृदुंग असे पारंपरिक पोशाख परिधान केले होते. प्रत्येक शाळेतून दिंडी मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यांवरून जाताना सर्वत्र भक्तीरस पसरला होता.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही सहभाग घेतला. त्यांनी देखील पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांच्या आनंदात आपला वाटा उचलला. काही शाळांमध्ये अभंग गायन, हरिपाठ व प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत नामदेव, संत सावता माळी, संत एकनाथ यांच्या वेशभूषा साकारत वारकरी परंपरेचा गौरव केला.
शाळांमध्ये या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, सामाजिक बांधिलकी व वारकरी संप्रदायाची माहिती रुजली. गावकऱ्यांनी व पालकांनीही या दिंडी सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या भक्तिरसात न्हालेल्या वेशभूषेने आणि जयघोषाने वातावरण अगदी पंढरपूरच्या वारीची आठवण करून दिली.
शाळांमधून मिळालेला हा आनंददायी अनुभव विद्यार्थ्यांच्या मनावर दीर्घकाळ कोरला गेला असून वारकरी परंपरेच्या संस्कारांची बीजे रुजविण्यात ही एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.