चोपड्यात दोन तरुणांकडून दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस जप्त; दोघांना अटक

चोपड्यात दोन तरुणांकडून दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस जप्त; दोघांना अटक
चोपडा (प्रतिनिधी ) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी २४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत दोन तरुणांकडून गावठी कट्टे, जिवंत काडतूस, मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे १.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना अटक करून त्यांच्यावर हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा-धुळे मार्गावरील बोरजनटो शिवारातील फॉरेस्ट नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली असता काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून दोन तरुण आले. त्यांची अंगझडती घेतली असता चालक जयेश सुरेश धापटे (रा. सहजीवननगर, धुळे) याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस मिळाले. तर मागे बसलेल्या फत्तेसिंग मिलनसिंग भादा (रा. दंडेवाले बाबा नगर, धुळे) याच्याकडूनही एक गावठी कट्टा सापडला. तसेच पल्सर मोटारसायकल, दोन मोबाईल हँडसेटसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईनंतर चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक, सफौ राजू महाजन, पोहेकॉ राकेश पाटील, पोकॉ विनोद पवार, पोकॉविठ्ठल पाटील आणि चालक पोकॉवसंत कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






