देवी विसर्जन मिरवणुकीत तुफान हाणामारी; खेडी कढोली येथे १३ जण जखमी, गावात तणाव

महा पोलीस न्यूज । दि.६ ऑक्टोबर २०२५ । एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये मोठी हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही गटांमधील एकूण १३ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी पंचायत समिती सभापती मोहन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी कढोली येथे जुन्या वैमनस्यातून हा वाद उफाळून आला. विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की करण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात तुफान मारामारी झाली. या हाणामारीत दोन्ही बाजूचे मिळून एकूण १३ जण जखमी झाले आहेत, ज्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
रुग्णालयातही तणाव
जखमी झालेल्या १३ जणांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोन्ही गटांचे लोक पुन्हा रुग्णालयात समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता दिसताच, तेथे जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर जखमींवर पुढील उपचार करण्यात आले.
या घटनेत प्रकाश सिताराम सोनवणे (२७), सोनान नारायण सोनवणे (२०), संदीप सिताराम सोनवणे (३०), ऋषिकेश विठ्ठल सोनवणे (३०), संतोष ऋषिदास सोनवणे (२०), पुरुषोत्तम मोहन सोनवणे (३०), किरण युवराज सोनवणे (४०), नितीन अरुण सोनवणे (२८), अरुण लहू सोनवणे (४९), मंगलाबाई सुरेश सोनवणे (५७), युवराज लहू सोनवणे (६०), दुर्गेश एकनाथ सोनवणे (३२), आणि राहुल मोहन सोनवणे (३५) हे जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंदवण्यात आलेली नव्हती. तथापि, गावातील शांतता बिघडवणाऱ्या या प्रकारामुळे खेडी कढोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास आणि शांतता राखण्यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत.






