सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस

सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १० चोरीच्या दुचाकींसह ७ गुन्हे उघड
नाशिक (प्रतिनिधी) – सिन्नर तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून १० चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करत ७ गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचत संशयित अजय दत्तात्रय दळवी (रा. विंचुरवळवी, सिन्नर) व अनिकेत श्रीधर मानकर (रा. राहुरी, भगूर-पांढुर्ली रोड) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी चिंचोली येथून मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीनंतर फरार साथीदार चेतन उर्फ सख्या शेळके (रा. विंचुर दळवी) याचा शोध सुरू आहे.
या आरोपींकडून पुढील चौकशीत त्यांनी सिन्नर तालुका तसेच संगमनेर, श्रीरामपूर, वणी, घोटी, कुंदेवाडी, दोडी येथून एकूण १० दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. संबंधित ७ गुन्हे उघडकीस आले असून, एकूण ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ४ हिरो स्प्लेंडर, ३ बजाज पल्सर, १ बजाज प्लॅटीना, १ रॉयल एनफिल्ड बुलेट, व १ होंडा युनिकॉर्न यांचा समावेश आहे.
दरम्यान, या आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत :
सिन्नर पो.स्टे. गु.र. ३३३/२०२४ कलम ३७९
वावी पो.स्टे. गु.र. २५०/२०२५
संगमनेर शहर पो.स्टे. गु.र. ६९७/२०२४
वणी पो.स्टे. गु.र. १९२/२०२४
घोटी पो.स्टे. गु.र. ६३/२०२४
श्रीरामपूर पो.स्टे. गु.र. ५१२/२०२५
आणखी काही गुन्हे तपासाअंती उघड होण्याची शक्यता
फरार आरोपी चेतन शेळके हा याआधी बलात्कारासह पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यात तीन वर्षे कारागृहात होता. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिसळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रविंद्र मगर, सपोनि. नवनाथ सानप, पो. अं. विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या या कसोशीनंतर सिन्नर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.