Politics

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार

प्रदेशाध्यक्ष अजहर तांबोळी यांची माहिती

महा पोलीस न्यूज । दि.१० ऑगस्ट २०२५ । महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागाच्या विकासाचा अभाव आणि मूलभूत सोयीसुविधांकडे होणारे दुर्लक्ष या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजहर तांबोळी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत, त्यांनी पक्ष किमान ५० टक्के जागांवर निवडणूक लढवेल असे सांगितले.

राजकीय परिस्थितीवर टीका

तांबोळी यांनी यावेळी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. ग्रामीण भागाचा विकास साधला तरच राज्याचा विकास शक्य आहे. तांबोळी यांनी जळगावमधील समस्यांवरही बोट ठेवले. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून येथील मूलभूत सोयीसुविधांची अवस्था वाईट आहे आणि जळगावातील अडचणी वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जबाबदार आहेत.

तांबोळी यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावरही भाष्य केले. ईडीच्या कारवाईमुळे राज्यात पक्ष बदलण्याची एक नवी परंपरा सुरू झाली असून, राजकीय वातावरण गढूळ बनले आहे, असे ते म्हणाले.

अल्पसंख्याक महामंडळात मोठा घोटाळा

अल्पसंख्याक विकास महामंडळातील कथित हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दाही तांबोळी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून या महामंडळाचे ऑडिट झालेले नाही आणि काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये व विशिष्ट लोकांनाच कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेषतः बारामती आणि सिल्लोडमध्ये बेसुमार कर्ज वाटप झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत पक्ष लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वक्फ बोर्डाच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली.

तिसऱ्या आघाडीची शक्यता

SDPI भाजप, संघ आणि एनडीएला वगळून इतर समविचारी पक्षांशी चर्चा करत आहे, असे तांबोळी यांनी सांगितले. राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी महाविकास आघाडीला भाजपची बी टीम म्हटले आणि काँग्रेसवर घराणेशाहीच्या राजकारणातून बाहेर न पडल्याबद्दल टीका केली. भाजप लहान आणि प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव राहील हनीफ आणि अब्दुल्ला खान यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. SDPI ने जळगाव येथे जिल्हा प्रतिनिधी परिषदेची बैठक घेऊन आपली जिल्हा कार्यकारिणी देखील जाहीर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button