Alert : महानगरी एक्सप्रेसमध्ये देशविरोधी घोषणा, ISI चा उल्लेख
सर्व रेल्वे स्थानकांना हाय अलर्ट; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महानगरी एक्स्प्रेसच्या एका डब्यातील शौचालयात “पाकिस्तान झिंदाबाद” आणि “आयएसआय” अशा देशविरोधी घोषणांचे शब्द आढळून आल्यानंतर बुधवारी रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. दादर स्थानकावर ही माहिती मिळताच, मार्गातील सर्व स्थानकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले.
गाडी भुसावळ येथे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल, जीआरपी व बीडीएस स्कॉडने संयुक्त कारवाई केली. गाडीच्या सर्व डब्यांची तपासणी करून प्रवाशांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
तपासादरम्यान असे आढळले की, देशविरोधी मजकूर असलेले शब्द कोणी तरी पुसून टाकले होते. मात्र कोणत्या उद्देशाने असा मेसेज लिहिला गेला, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायकर यांनी सांगितले की, “गाडीची तपासणी पूर्ण केल्यानंतर सकाळी नऊ वाजता ती भुसावळ स्थानकावरून सुरक्षितपणे रवाना करण्यात आली आहे.” या घटनेचा तपास सुरू असून, संबंधित प्रवासी वा संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.






