
सोलर पॅनल असूनही मीटर नसल्याने भुसावळकरांना लाखोंचा भुर्दंड; केदार सानप यांची कार्यवाहीची मागणी
भुसावळ (प्रतिनिधी) – नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्र व नगरपालिका मुख्य कार्यालय येथे सोलर पॅनल बसविण्यात आले असूनही अद्यापपर्यंत मीटरची व्यवस्था न करण्यात आल्याने शहरातील नागरिकांना लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (म.रा.वि.मं.) कार्यकारी अभियंता यांना तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी २३ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात श्री. सानप यांनी नमूद केले आहे की, जलशुद्धीकरण केंद्र आणि नगरपालिका कार्यालयावर लाखो रुपयांचा खर्च करून सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. मात्र, त्या ठिकाणी मीटर नसल्यामुळे वीजबिलाची अचूक मोजणी होत नसून नागरिकांना अनावश्यक खर्च सहन करावा लागत आहे.
श्री. सानप यांनी कार्यकारी अभियंता श्री. भामरे यांना निवेदन सादर करताना, १५ ऑगस्ट रोजी म.रा.वि.मं.च्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही दिला आहे. तसेच, याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रत माहितीस्तव मला उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन मीटर बसवण्याची मागणी आता तीव्र होत आहे.