आजारी सासऱ्यासाठी कुलर न दिल्याने जावयाने मारला डल्ला
महा पोलीस न्यूज | १४ जुलै २०२४ | आजारी असलेल्या सासऱ्याने मामेभाऊकडे कूलर मागितले असता ते त्यांनी दिले नाही. जावयाला हा प्रकार माहिती पडताच जावयाने मामेसासऱ्याच्या घरातच डल्ला मारल्याची घटना जळगावात घडली आहे. जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला असून दोघांना अटक केली आहे. कृष्णा पांडूरंग सोनवणे वय २८ रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागात आनंदपाल बाबुराव बाविस्कर हे वास्तव्याला आहे. दि.११ जुलै रोजी पहाटे ५ वाजता ते मार्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा दिव्यांग पुतण्या घरात झोपलेला होता. त्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. याचा फायदा घेत चोरट्याने घरातून २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी फिर्यादीचा भाचे जावई कृष्णा सोनवणे याने केली असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ किशोर निंकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, सतिष पाटील, पो.ना. योगेश पाटील, अमोल ठाकूर आणि रतनहरी गिते यांच्या पथकाने कारवाई करत रविवार दि.१४ जुलै रोजी सकाळी त्याला ताब्यात घेतले.
चोरट्याने घरातील स्पीकरमध्ये लपवलेला मुद्देमाल काढून दिला आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सासऱ्यांना कुलर न दिल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.