सुरक्षारक्षकाने मद्यपान करून गैरवर्तन केल्याने रुग्णालयातून काढले

मुक्ताईनगर |सुभाष धाडे – येथील जिल्हा उपरुग्णालयात मद्यपान करून रुग्णांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका सुरक्षारक्षकाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली. एका महिला रुग्णाच्या समोर सुरक्षारक्षकाने मद्यपान करून गैरवर्तन केले. या महिलेच्या नातेवाईकांनी तात्काळ राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे फोनवरून तक्रार केली.
महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून त्या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी सांगितले की, हा कर्मचारी धुळे येथील सुरक्षा रक्षक मंडळाशी संबंधित होता. त्याला रुग्णालयातून काढून मंडळाकडे जमा करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वर्तनाबद्दल नोटीस देण्यात आली होती, पण त्याच्या वागण्यात सुधारणा न झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून काढण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यांनी या सुरक्षारक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर, त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्तव्यावर असताना सुरक्षारक्षक मद्यधुंद अवस्थेत कसे असतात, आणि रुग्णालय प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष का नाही, असे अनेक प्रश्न जनतेमध्ये उपस्थित होत आहेत.






