
महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई देशमुख उद्यानात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचा आरोप करत राष्ट्रीय जनमंचचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, भडगाव रोडलगत असलेल्या सुवर्णाताई देशमुख उद्यानात बांधकामाला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चाळीसगावचे उपविभागीय अभियंता यांनी केवळ ८ झाडांची तोड करण्यास परवानगी मागितली होती. त्यानंतर नगरपरिषदेकडून केवळ धोकादायक व वाळलेली अशी एकूण ८ झाडे (निंब, बदाम, पिंपळ व वड) तोडण्यास परवानगीही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात २५ ते ३० चांगली, हिरवीगार, डेरेदार व धोकादायक नसलेली झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या अनधिकृत वृक्षतोडीमुळे परिसरातील पर्यावरणाला कधीही भरून न निघणारी हानी झाल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशातील अटी व शर्तींचा भंग करून हेतुपुरस्सर बेकायदा वृक्षतोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लांडगे यांनी आपल्या तक्रारीत मुख्याधिकाऱ्यांकडे खालील मागण्या केल्या आहेत –
१) या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा.
२) संबंधित दोषींवर प्रत्येकी झाडासाठी १ लाख रुपये दंड आकारण्यात यावा.
या तक्रारीसोबत त्यांनी वृक्षतोडीचे फोटो पुरावे म्हणून जोडले आहेत. या प्रकरणामुळे चाळीसगाव शहरात पर्यावरणाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.