
“यंग इंडिया – फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ‘सुपोषण जळगाव’ अभियानाचे जिल्हा परिषदेत उद्घाटन
जळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत जंक फूडचे सेवन झपाट्याने वाढत असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी “यंग इंडिया – फिट इंडिया” या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत “सुपोषण अभियान” राबविण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
या मोहिमेचे भव्य उद्घाटन मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या हस्ते संपन्न झाले.
अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी अभियान प्रायोगिक स्वरूपात घेण्यात आले होते. या तपासणीत अनेक विद्यार्थ्यांमध्ये वाढलेले साखरेचे प्रमाण आढळून आले असून, बदलत्या आहारशैलीचे आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे जनतेमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे.
या सुपोषण अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बेंगळुरू येथून विशेष मार्गदर्शनासाठी आलेले आहारतज्ज्ञ डॉ. देवजी यांनी दैनंदिन आहारातील संतुलन, आवश्यक पोषकतत्वांचे महत्त्व, तसेच सदृढ शरीर आणि निरोगी मनासाठी जीवनशैली कशी असावी याबाबत सविस्तर व वैज्ञानिक मार्गदर्शन केले.
त्यांनी कार्यशाळेत सांगितले की, “आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण न कळत खूप मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन करतो, तसेच उच्च दर्जाची प्रथिने आपल्या आहारातून हळूहळू निघून जात आहेत.” हे त्यांनी ठोस उदाहरणांसह स्पष्ट करून दाखवले.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, सी.डी.पी.ओ. तसेच आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






