पाचोरा येथे लाचखोर महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, एसीबीच्या पथकाने बुधवारी ही धडक कारवाई केली.
एका तक्रारदाराची पत्नी पळसणे शिवारातील जमीन वहिताखाली लावण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी लोखंडे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. नैसर्गिक आपत्तीची भरपाई आणि शेतीसाठी कर्ज मिळवण्यासाठी ही प्रक्रिया करणे आवश्यक होते.
तक्रारदाराकडून ५ हजार रुपये आधीच स्वीकारल्यानंतर, उर्वरित १० हजार रुपयांसाठी लोखंडे सतत तगादा लावत होता. अखेर तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे तक्रार केली.
एसीबीने या तक्रारीची गंभीर दखल घेत, ९ सप्टेंबर रोजी सापळा रचला. बुधवारी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लोखंडे याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, शिपाई भूषण पाटील, राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे इतर लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.






