शिवछत्रपतींच्या कार्याला आमंत्रणाची नव्हे, तर अंतःकरणाची गरज – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
आजपासून जिल्ह्यात श्रीदुर्गादौडीचे आयोजन !

शिवछत्रपतींच्या कार्याला आमंत्रणाची नव्हे, तर अंतःकरणाची गरज – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
आजपासून जिल्ह्यात श्रीदुर्गादौडीचे आयोजन !
जळगाव प्रतिनिधी- मराठ्यांना देव, देश अन् धर्माच्या कार्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. ज्याच्या अंत:करणात, ज्याच्या काळजात ‘शिवाजी’ नावाच्या माणसाची ठिणगी पडली आहे आणि ‘तानाजी’ नावाचा आदर्श ज्यांच्या जीवनात आहे, ते लोक जिथे जिथे पोकळी असेल तिथे तिथे देव, देश, धर्मासाठी उभे ठाकतात, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हाच महाराष्ट्राचा स्वभाव आहे. हिंदवी स्वराज्यासाठी तुला लढावे लागेल, असे आवाहन कोणी तानाजीला केले होते ? ते उमरठ नावाचं एक छोटसं गाव तिथून तो तानाजी नावाचा एक तरुण उठला, गेला अन् शिवाजी राजाला सर्वस्व वाहिले. हिंदवी स्वराज्यासाठी, हिंदूंच्या राज्यासाठी एक किल्ला घेतांना त्यांनी देह ठेवला. त्या बाजीप्रभूंना घोडखिंडीत थांबून तुम्हाला शत्रूला अडवायचे आहे, असे कोणी सांगितले होते ? त्या मुरारबाजींना पुरंदरावर मरायची प्रेरणा कोणी दिली होती ? त्या शिवा काशिद यांना त्या पालखीतून शिवाजी राजेंच्या जिवितासाठी स्वतःच्या मृत्यूचे दान द्यायला कोणी स्फूर्ती दिली होती ? नागोजी जेधे, कृष्णाजी कंक यांच्या बापांना स्वराज्याचे कर्तव्य आधी आणि मग बापाचे कर्तव्य असे कठोर व्रताचे जीवन जगण्याचे आदेश कोणी दिले होते ? ही स्वयंप्रेरणा होती. ही स्वयंस्फूर्ति होती. ज्याच्या अंतकरणात शिवाजी नावाच्या एका मातृभूमीच्या पुताचा स्वयं तेजस्वी प्रकाश असतो. त्या कोणालाही हिंदवी स्वराज्यासाठी, देश, धर्मासाठी आमंत्रणाची गरज नाही. आपल्या रक्तात शिवाजी महाराज नावाच्या एका महापुरुषाचे काही अंश असतील, त्यांच्या विचाराचे काही कण शिल्लक असतील तर आणि तरच देशाधर्माच्या कामात यायची स्वयंप्रेरणा जागी होईल. सगळा समाज क्षत्रिय झाला तर राष्ट्रे जगतात. क्षत्रियत्व म्हणजे फक्त रणात निडरपणे लढणे नि मारणे, मरणे नव्हे.
सगळा समाज क्षत्रिय असतोच पण त्या समाजातलं ते दडलेलं क्षात्रतेज जागृत कराव लागत आणि ते क्षात्रतेज जागृत झाल की अवघा समाज लढाऊ बाण्याचा होतो. ते क्षात्रतेज जागृत करण्याचे एक माध्यम म्हणजे श्रीदुर्गामातादौड ! जात-पात, पंथ-वर्ण, संप्रदाय, भाषा, गट-तट, पक्ष, राजकारण, लहानमोठा, पदप्रतिष्ठा, मानसन्मान, हारतुरे हे सगळं विसरुन अवघा हिंदु समाज स्त्री पुरुष भेद न करता भगव्या ध्वजाच्या छत्रछायेखाली हिंदवी स्वराज्य पुनःसंस्थापनेच्या सिद्धतेसाठी एकादिलानं एकाध्येय्याने एकत्रित येतो,
तो उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड ! हिंदवी स्वराज्याच्या कार्यासाठी असलेली निष्ठा वृद्धिंगत करण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी आई तुळजाभवानीला मारलेली आर्त हाक म्हणजे श्री दुर्गामाता दौड !
समाज ज्या देवतांना पुजतो राष्ट्र त्याच वृत्तीचे होते. समाज बलवान बनवायचा असेल तर तशाच क्षात्रवृत्तीच्या नि बलशाली देवतेची आळवणी करावी लागते, उपासना करावी लागते. आपल्या शस्त्रयुक्त अष्टकरांनी जिने निरंतर राक्षसी,दैत्यी शक्तींचा विनाश केला त्या श्रीतुळजामाता,श्रीकालिमाता,श्रीदुर्गामातेची उपासनाच करावी लागते. म्हणूनच आपण श्रीदुर्गामातादौड या उपक्रमाच्या माध्यमातून घटस्थापना ते विजयादशमी (22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) रोज पहाटे सहा वाजता श्रीतुळजामाता,श्रीकालिमाता,श्रीदुर्गामातेची आळवणी करतो,उपासना करतो. हा उपक्रम जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घेण्यात येत आहे. तरी सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी आपापल्या विभागातील पुर्व नियोजित स्थळी पारंपारिक पोशाखात, डोक्यावर भगवा फेटा बांधून किंवा वारकरी टोपी घालून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजवावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या जिल्हा संयोजकांकडून करण्यात येत आहे. श्री दुर्गामाता दौड मध्ये सहभागासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क करा 7875577135






