अमळनेर नगरपालिकेचा गणेशभक्तांच्या सोयीकडे कानाडोळा

अमळनेर नगरपालिकेचा गणेशभक्तांच्या सोयीकडे कानाडोळा ; नगरपालिकेच्या दुर्लक्षावर मंडळाची ‘गांधीगिरी’
अमळनेर: गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छतेची हमी देऊनही अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी, राजे संभाजी मित्र मंडळाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची (मुतारी) अवस्था इतकी वाईट आहे की गणेशभक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गणेशोत्सवाच्या बैठकीत नगरपरिषदेने दररोज सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केले. येथील आरोग्य निरीक्षक तर तक्रार करणाऱ्या नागरिकांनाच ‘अमळनेरकरांचेच नावाने खडे फोडत’ असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
शेवटी, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने मंडळाने अनोखी ‘गांधीगिरी’ केली आहे. त्यांनी नागरिकांची माफी मागत एक फलक लावला आहे, ज्यावर “नगरपरिषदेने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे आम्ही गणेशभक्तांची माफी मागतो” असा मजकूर आहे. तसेच, मंडळ आपल्या स्वतःच्या खर्चाने दररोज ही मुतारी स्वच्छ करून दुर्गंधी प्रतिबंधक फवारणी करत आहे.
मंडळाच्या या कृतीमुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली असताना, दुसरीकडे मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात नगरपरिषद अपयशी ठरली आहे, ज्यामुळे गणेशोत्सवाचा एकप्रकारे अपमानच होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






