यावलमध्ये बेपत्ता बालकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला; हत्येचा संशय

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील बाबूजीपुरा परिसरात राहणारा हन्नान खान (वय ७) हा लहान मुलगा काल दि.५ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता पसरली होती. कुटुंबीयांनी शोधाशोध करून अखेर पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली. मात्र आज (६ सप्टेंबर) दुपारी त्याचा मृतदेह शेजारील एका बंद घरात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने ही हत्या असल्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, यावल येथे पाठवला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ज्या घरातून मृतदेह सापडला, त्या घरमालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागचे नेमके कारण काय, तसेच मुलाचा खून कोणी आणि का केला, याचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
या अमानुष कृत्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






