जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी नियोजनबद्ध काम करावे- पालक सचिव राधास्वामी एन.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी नियोजनबद्ध काम करावे- पालक सचिव राधास्वामी एन.
जळगाव : जळगाव जिल्हा हा राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करण्यास खूप मोठा वाव असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, सर्व यंत्रणांनी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव रामास्वामी एन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित, जिल्हा विकास आराखडा, जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प या विषयांच्या आढाव बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.
पालक सचिव रामास्वामी एन म्हणाले, जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यातील विकास कामांसाठी विविध विभागांना निधी देण्यात येतो हा निधी विकास कामांसाठी वेळेत खर्च होणे अपेक्षित असते. त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी, विविध कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता वेळेत वेळेत घेऊन सर्व निधी 31 मार्च पूर्वी खर्च होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत निधी खर्च करताना कामाची गुणवत्ता राखली जाईल याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. विविध विकासाची कामे करताना, कामांचे सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून निधी वेळेत खर्च होईल याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
विजन डॉक्युमेंट २०४७ व जिल्हाचा भविष्यातील विकास हे डोळ्यासमोर ठेवून आपल्या विभागाचा विकास आराखडा तयार करावा असे निर्देश, देऊन ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून कृषी सिंचन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि फिशरीज सारख्या रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रस्ताव, विविध विभागांमधील रिक्त पदे आदी बाबतची माहिती प्रशासनास सादर करावी. या संदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक विभागाच्या प्राधान्याच्या योजना राज्यस्तरावर मंजूर होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.प्रमोद महाजन कौशल विकास योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून तरुणांना आधुनिक शेती व ड्रोन ऑपरेशन सारख्या कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आढावा बैठकीच्या सुरुवातीला, पालक सचिव यांना जिल्हाधिकारी श्री घुगे यांनी जिल्ह्यातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची व प्रकल्पांची माहिती दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करणवाल यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती तर मनपा आयुक्त श्री ढेरे यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांची माहिती दिली, जिल्हा नियोजन अधिकारी श्री शिंदे यांनी, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विविध कामांची माहिती, सादरीकरणाद्वारे सादर केली.
यावेळी आरोग्य,नगर विकास जलसंपदा,कौशल्य विकास, उद्योग, कृषी, ऊर्जा आदि विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची, प्रकल्पांची सद्यस्थितीबाबत माहिती सादर केली.






