अमळनेर पालिकेने पटकावला स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक!

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयामार्फत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध करत १२५०० पैकी ९००३ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्येही अमळनेर नगरपरिषदेने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला होता, ज्यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
१७ जुलै २०२५ रोजी जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या निकालांनुसार, अमळनेर शहर केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात नाशिक विभागात चौथ्या स्थानावर, राज्यात १७ व्या स्थानावर, तर देशातील ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटातील स्वच्छ शहरांमध्ये ११० व्या क्रमांकावर आहे. या यशाबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अमळनेर शहरातील सर्व नागरिकांचे, नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसह स्वच्छ सर्वेक्षणासाठी अथक परिश्रम घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वच्छता अभियान केवळ शासकीय यंत्रणांपुरते मर्यादित न राहता, त्यात नागरिकांचाही सक्रिय सहभाग असावा, यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला जातो. नगरपरिषदांना विविध घटकांच्या आधारे गुणांकन दिले जाते. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत सर्टिफिकेशन आणि सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस हे प्रमुख घटक होते, जे एकूण १२५०० गुणांसाठी विचारात घेतले गेले.
सर्टिफिकेशन या घटकात शहर हागणदारीमुक्त (Open Defecation Free – ODF) आहे की नाही आणि कचरामुक्त शहराचे (Garbage Free City – GFC) मानांकन कसे आहे, यावर गुण दिले जातात. यामध्ये अमळनेर पालिकेला २५०० पैकी हागणदारीमुक्त शहर (ODF) मानांकनात १००० गुण मिळाले आहेत.
सिटिजन व्हॉइस प्रकारात पालिकेने केलेली जनजागृती, नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि एकूण सहभाग यांचा समावेश असतो. तर, सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस मध्ये एकूण १०,००० गुणांसाठी स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या कामांची कागदपत्रे आणि प्रत्यक्ष पाहणीचा समावेश असतो. या घटकात अमळनेर पालिकेने १०,००० पैकी ८००३ गुण मिळवले, ज्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणात पालिकेचे मानांकन लक्षणीयरीत्या सुधारले.
अमळनेर पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरीचा दर्जा सातत्याने सुधारला आहे. या यशाचे श्रेय शहरवासीयांच्या वाढत्या स्वच्छतेच्या सवयींनाही जाते. प्रशासनाने सर्व शहरवासीयांना जास्तीत जास्त स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हे यश भविष्यातही टिकवून ठेवता येईल.