वाक येथे गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई.
तहसील कार्यालयात जमा.

भडगाव | सागर माळी – तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर भडगाव येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रॅक्टरवर लवकरच दंडात्मक कारवाई केली जाईल, असे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये तहसीलदार शीतल सोलाट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अविनाश जंजाळे, समाधान हुलहुले, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, ग्राम महसूल सेवक समाधान माळी, किरण मोरे, नितीन मोरे, विशाल सूर्यवंशी आणि चालक लोकेश वाघ यांचा समावेश होता.
स्थानिक शेतकऱ्यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, वाक येथील गिरणा नदीपात्रातून पाचोरा, पारोळा, आणि धुळे येथून येणारे डंपर आणि ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक करतात, त्यामुळे या भागाकडे पोलीस आणि महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन ही अवैध वाहतूक तात्काळ थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भविष्यात असे डंपर आणि ट्रॅक्टर आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.






