जळगाव महापालिकेत महायुतीचा धडाका; शिवसेना शिंदे गटाची चौथी जागा बिनविरोध

जळगाव महापालिकेत महायुतीचा धडाका; शिवसेना शिंदे गटाची चौथी जागा बिनविरोध
जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. यात शिवसेना शिंदे गटाने मोठी बाजी मारली असून, प्रभाग १९ (अ) मधून रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयामुळे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे आतापर्यंत ४, तर महायुतीचे एकूण ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
महापालिकेच्या ७५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आज, २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत प्रतिस्पर्धी उमेदवारांची माघार घडवून आणण्यासाठी जोर लावला होता. यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे.
यांचे झाले विजय निश्चित:
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग १२ (ब) मधून बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर माघारीच्या सत्रात शिवसेनेने आपला गड मजबूत केला. प्रभाग १८ (अ) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची निवड बिनविरोध झाली. त्यापाठोपाठ प्रभाग ९ (अ) मधून मनोज चौधरी आणि ९ (ब) मधून अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा देशमुख यांचा मार्ग मोकळा झाला.
शेवटच्या दिवशी शिवसेनेचा ‘चौकार’:
आज माघारीच्या अंतिम दिवशी प्रभाग १९ (अ) मधून रेखा चुडामण पाटील यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेची चौथी जागा खिशात पडली आहे. ७५ जागांपैकी ५ जागांवर निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीने विजय मिळवल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा रंगली आहे. आता उर्वरित ७० जागांसाठी येणाऱ्या काळात चुरशीची लढत पाहायला मिळणार असून, या बिनविरोध निवडीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महापालिका निवडणुकीत वाढत्या बिनविरोध निवडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, उर्वरित प्रभागांतील लढतींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






