आषाढीला मोठी कारवाई : शनिपेठ पोलिसांनी पकडले ५० किलो गोमांस

महा पोलीस न्यूज । दि.६ जुलै २०२५ । जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी आषाढी एकादशीला मोठी कारवाई केली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपुरा भागात एका दुमजली घरात एक संशयित व्यक्ती गोमांस विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह छापा मारुन या घरातून ५० किलो गोमांस, सुरा व वजनकाटा असे १० हजार ५५० रुपयांचे साहित्य जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गोपनीय बातमी देत रामलालजी चौबे शाळेच्या मागे इस्लामपुरा भागात गोमांस विक्री केले जात आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी, कर्मचारी शशिकांत पाटील, प्रदिप नन्नवरे, विजय खैरे, विकी इंगळे, रवींद्र तायडे यांचे पथक व वाजिद खान मेहमूद खान (रा.भिलपुरा चौक), नीलेश सुरेश जावळे (रा.गुरुनानक नगर, शनिपेठ) या दोन पंच साक्षीदारांना सोबत घेऊन रवाना झाले.
पथकाने इस्लामपुरा भागात मदिना मस्जिदजवळ असलेल्या संशयीत दुमजली इमारतीचे दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला. घरझडती घेतली असता सादिक साबीर शेख (वय २८) हा गोमांस विक्री करीत असल्याचे आढळुन आले. त्याच्याकडून गोमांस, सुरा व वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. शशिकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सादीकच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून भविष्यात देखील अशीच कारवाई सुरु राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






