धक्कादायक : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून युवकाची दगडाने ठेचून हत्या !
अमळनेर शहरातील थरारक घटना ; संशयीतालाअटक

अमळनेर प्रतिनिधी I केवळ तंबाखू न दिल्याच्या किरकोळ वादातून एका ३८ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना येथे रविवारी उघडकीस आली असून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पैलाड भागात रविवारी (दि. २१) रात्री घडलेल्या युवकाच्या हत्येच्या घटनेने परिसर हादरला आहे. मृताचे नाव मुकेश भिका धनगर (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड, अमळनेर) असे आहे. तर संशयित आरोपी निखिल विष्णू उतकर (वय ४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) याला पोलिसांनी रात्रीच अटक केली.
घटनेची फिर्याद मृताचा नातेवाईक दिनेश धनगर याने पोलिसांत दिली आहे. त्यानुसार, रात्री सुमारास ११ वाजता हेडावे नाक्याजवळील वडाच्या झाडाखाली मुकेश व निखिल यांच्यात तंबाखूवरून वाद झाला. वाद चिघळल्याने आरोपी निखिलने अचानक मोठा दगड उचलून मुकेशच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबर मारले. दिनेशने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही दगड लागून तो किरकोळ जखमी झाला. तो मदतीसाठी धावला, पण परत येईपर्यंत मुकेश गंभीर जखमी होऊन कोसळला होता. तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी निखिलला पकडले. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
या खुनामुळे अमळनेर शहरात एकच खळबळ उडाली असून, तंबाखूसारख्या क्षुल्लक कारणावरून जीव घेण्याइतका हिंसाचार वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.






