
भ्रष्टाचाराविरोधात खडसे-पाटील यांचा दणका : अधीक्षक अभियंता सोनवणे यांची बदली!
जळगाव प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची औरंगाबाद नगर परिषद संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. ही केवळ नियमित प्रशासकीय प्रक्रिया नसून मोठ्या राजकीय हालचालींनंतर घेतलेला निर्णायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या जोरदार प्रयत्नांमुळे ही बदली झाल्याची माहिती समोर आली आहे.202503181130294018
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराला वाचा फोडण्याचे काम माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू ठेवले होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आठ चार्जशीट दाखल करून संबंधित गैरव्यवहार सरकारपुढे मांडले.
२४ तासांत प्रशांत सोनवणे यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील हे या संपूर्ण मोहिमेचे मास्टरमाईंड मानले जात आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे गोळा केले. विशेष म्हणजे, मुंबई, नाशिक, जळगाव येथे फेऱ्या मारून जवळपास १५ ते २० लाख रुपये खर्च करून संबंधित कागदपत्रे जमा केली आणि त्याचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली अखेर सोनवणे यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय झाला.
हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश होणार?
सुभाष पाटील यांनी “बोलताना सांगितले की, “माझा लाखो रुपयांचा खर्च झाला असला तरी भ्रष्टाचाराविरोधात लढणे माझे कर्तव्य आहे. प्रशांत सोनवणे यांची बदली ही सुरुवात आहे. यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागातील अंदाजे ५०० कोटींपर्यंतच्या जादा दराने मंजूर करण्यात आलेल्या टेंडरची चौकशी करून त्यातील गैरव्यवहार उघड करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू राहील. भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे!”
या बदलीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. खडसे आणि पाटील यांच्या या निर्णायक पावलांमुळे आगामी काळात आणखी मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.