गिरणा प्रकल्पाचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा प्रकल्पाचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी : पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत येणाऱ्या गिरणा मोठ्या प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढल्याने मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता प्रकल्पाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. याअन्वये गिरणा धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ७,४२८ क्युसेक्सवरून वाढवून ९,९०४ क्युसेक्स (२८०.२८ क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे.
सध्या धरणातील वक्रद्वार क्र. १ आणि ६ हे प्रत्येकी ६० सेंमी तर वक्रद्वार क्र. २, ३, ४ आणि ५ हे प्रत्येकी ३० सेंमी इतके उघडण्यात आले असून, त्यामुळे गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुढील काही तासांत धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात बदल करण्यात येऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठी असलेल्या गावांतील नागरिक, शेतकरी व जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन केले आहे. नदी पात्रात उतरू नये, तसेच कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.






