जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेत १० गावठी कट्टे, २४ काडतूस जप्त; १२ जणांविरुद्ध गुन्हे

जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेत १० गावठी कट्टे, २४ काडतूस जप्त; १२ जणांविरुद्ध गुन्हे
जळगाव : प्रतिनिधी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेत पोलिसांनी १० गावठी कट्ट्यांसह २४ जिवंत काडतूस जप्त केले असून, १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही मोहीम १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने राबविण्यात आली. या दरम्यान विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांतून पाचोरा, अमळनेर, यावल, भुसावळ, वरणगाव आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संशयितांना अटक करण्यात आली.
पाचोरा पोलीस ठाण्याच्या कारवाईत समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले (रा. अमळनेर) याच्याकडून दोन कट्टे व चार काडतूस, तर यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर (रा. यावल) आणि एका अन्य साथीदाराकडून एक गावठी कट्टा आणि दोन काडतूस जप्त करण्यात आले.
भुसावळ येथील अमर देवसिंग कसोटे (रा. भुसावळ) याच्याकडून एक कट्टा आणि दोन काडतूस मिळून आले असून, त्याच्याविरुद्धही एक गुन्हा दाखल आहे. वरणगाव येथील काविन बाबू भोसले (रा. हलखेडा) याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन काडतूस, तर एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत विठ्ठल वामन भोळे (रा. जळगाव, ह.मु. पुणे) याच्याकडून एक कट्टा आणि चार काडतूस जप्त करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद आहे.
या मोहिमेत पोलिसांनी अवैध शस्त्रांचा मोठा साठा रोखण्यात यश मिळवले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.






